Skip to content Skip to sidebar Skip to footer

वादळ शमलं ? छे!

मागील लेखात इस्रायेल- हमास युद्ध पेटल्यामुळे चिंता व्यक्त केली होती. संपूर्ण सप्ताह शेअर बाजार बातम्यांच्या तालावर वरखाली होत होता. अमेरिकन व्याजदर कमी होण्याची आशा पल्लवित झाल्यामुळे तेथील बाजार तेजीत गेले होते. ‘राजा बोले दल हले’ या उक्तीप्रमाणे जागतिक बाजार उगीचच वर गेले. निफ्टी आणि सेन्सेक्स वर जाऊन खाली आले. ९ ऑक्टोबर रोजी १९४८० या पातळीची भीती दाखवत ११ तारखेला लगेच १९८०० च्या पुढे मजल मारून पुन्हा परत फिरले. गेल्या सहा दिवसात निफ्टीने १९८५० ची लक्ष्मणरेषा काही पार केलेली नाही. यापुढे लवकर ती शक्यताही दिसत नाही. पण निफ्टी फारशी खालीही आली नाही. सप्ताहाअंती निफ्टीने १९५४२ चा बंद दिला. त्यामुळे खनिज तेलामुळे होऊ शकणारे वादळ, न येताच शमलं की काय असे वाटू शकते . बरेचदा अरबी समुद्रात, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येणारी समुद्रातली चक्रीवादळं नुसती किनाऱ्याला स्पर्श करून जातात , फारसं नुकसान करीत नाहीत , तसं झाल्यास ठीकच. पण दोन्ही पक्ष ज्या त्वेषाने इरेला पेटले आहेत की हे युद्ध चिघळेल असे वाटते. काळच पुढे काय ते ठरवेल पण सावध राहिलेले उत्तम .

दरम्यान अमेरिकन संरक्षण सामुग्री पुरवठा करणाऱ्या कंपन्या जरी तेजीत असल्या तरी बॉंड यील्ड्स ५ टक्क्यावर आल्यामुळे मंदीवाल्यांना लागलीच पुढील स्वप्ने पडत आहेत. अमेरिकन विक्स तेजीत येत आहे. मागील आठवड्यात सूचित केल्याप्रमाणे सोने १८४० $ वरून १०० $ वाढले, आपल्याकडेही माफक वाढ झाली. अर्थात युद्ध चिघळल्यास सोने, खनिज तेल व इतर व्यापारी धातुजन्य कच्चा माल महाग होईल हे सांगण्यास कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही . काय होऊ शकते ह्याची ही चुणूक दिसली एव्हढेच. सोने अल्पावधीत तेजीत येणे, एक महत्वाचा संदेश देत आहे. तो आहे संयमाचा व सोन्यातील गुंतवणुकीचा !

शेअर बाजार एका टप्प्यात चालेल असे म्हटल्यावर, अल्प मुदतीचे सौदे करता येतील. यावेळी आपल्या धोरणात एक फरक करता येईल. तो म्हणजे शेअर बाजारात खरेदीच्या ऐवजी विक्रीच्या संधी शोधणे. अल्प मुदतीत होत असलेला नफा खिशात टाकलेला चांगला. पुढे हेच शेअर्स खाली आल्यावर पुन्हा विकत घेता येतील. विशेषत: बँकिंग क्षेत्रात. अॅक्सीस बँक (६५० च्या दरम्यान अभ्यासास सुचवलेला) ,व इतर सरकारी बँकांची खरेदी खालच्या भावात झालेली असेल तर विक्री करायला काय हरकत आहे? फारशा वाढलेल्या अथवा न वाढलेल्या ,सरकारी व निमसरकारी कंपन्या नजरेसमोर असू द्याव्या. असे करणे फार कठीण वाटत असेल तर काही न करणे चांगले. हे वादळ आल्यास ते शांत
होईपर्यंत थांबणे उत्तम.

खरेदी चोखंदळपणे व ज्या दिवशी शेअर बाजार खाली असेल तेव्हाच करायची आहे. त्यासाठी १९३०० व त्याखाली १८९००-१९००० हि निफ्टीची पातळी योग्य आहे. त्याच बरोबर सणासुदीच्या वेळी वाहनांबरोबर दागिने आणि कपड्यांची खरेदी होणारच. टायटन, कल्याण ज्वेलर्स , त्रिभुवनदास गेल्या सहा महिन्यात बरेच वाढले आहेत. तरीही तेजीचा एक झोका त्यात शिल्लक आहे. सहसा दिवाळी, दसरा दुचाकी वाहनांना नवे ग्राहक देतो. त्यात बजाज ऑटो ने जोरदार कामगिरी दर्शवली आहे. विक्री सहा टक्क्याच्या आसपास वाढली असली तरी नफा १७ टक्के वर गेला आहे. टीव्हीएस मोटर आणि आयशर मोटर च्या तुलनेत आजच्या भावाला देखील बजाज स्वस्त वाटतो. किंमत /मिळकत गुणोत्तर २२.५ आहे.( आयशर २९.५८ आणि टीव्हीएस ५२.५ ) भांडवलाचा उतारा देखील ( ROCE २६.२ %) तोडीसतोड आहे. कच्चा माल मुख्यत: धातू स्वस्त झाल्यामुळे तसेच निर्यात वाढल्यामुळे हे शक्य झाले. पुढे दसऱ्याची खरेदी खुणावत आहेच ! गेल्या पंधरा वर्षात प्रथमच शेअरने ५३०० च्या वर डोके काढले आहे. परंतु दमाने घेतलेले चांगले. शेअर खाली आलाच तर ५००० ते ५२०० या दरम्यान हा शेअर आकर्षक वाटतो. जर तसे झाले नाही तर एखादी संधी हातातून निसटली असे काही काळ वाटेल, ती रुखरुख सहन करावी. शेअर बाजार सर्वांनाच संधी देत असतो. त्यात तेजीवाले व मंदीवाले असा भेदभाव नाही. इतका अभ्यास करून देखील चालू भावात शेअर विकत घेण्याची जोखीम स्वीकारलीच तर तो खाली आल्यास भांडारात नव्याने वाढवायला हवा.

तीच कथा बजाज फायनान्सची ! बजाजचे हे भावंड नेहमीच निकाल उत्कृष्ट देते. पण नेहमी मेरीट मधे येणाऱ्या हुशार मुलाला परीक्षेत फक्त प्रथम वर्ग मिळाला आणि म्हणून पालक नाराज व्हावे, तसे बाजाराने वागून दाखवले. अंमलाखालील मालमत्ता वाढली, नीम म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन वाढली , नक्त नफा २८ टक्क्यांनी वाढून ३५५० कोटी झाला . म्हणजेच, असाच चक्रव्याढ पद्धतीने वाढत गेल्यास आर्थिक वर्ष २०२४-२५ चा नफा किमान १४ ते १८००० कोटी होऊ शकतो. असा नफा झाल्यास किंमत /मिळकत गुणोत्तर २७-२८ च्या दरम्यान येऊ शकेल. त्याबरोबर कंपनीने नवे भाग भांडवल उभे करायचे ठरविले आहे. ते संस्थात्मक गुंतवणूकदारांना क्यू आय पी पद्धतीने दिले जाईल. बाजारभाव स्थिर झाल्यावर ते थोड्या सवलतीच्या दरात दिले जाईल. कितीही सवलत द्यायची म्हटले तरी तो भाव ७००० रुपयांपेक्षा कमी असेल असे वाटत नाही. ती गुंतवणुकदारांसाठी प्रवेशाची एक संधी असेल. कंपनीने ठेव बाजारातून मोठ्या ठेवी गोळा केल्या आहेत. तसेच
पुढे क्यू आय पी द्वारे स्वस्त भांडवल जमा करण्याचा मानस आहे. हातातील मालमत्तेवर ( रिटर्न ऑन असेट्स ) साडेचार टक्के नफा करण्याची कंपनीची क्षमता आहे. ( आज तो ४.२% आहे ). नजरेसमोर ठेऊन योग्य संधी साधून जवळ करण्याजोगा असा हा शेअर आहे.

जर शेअर बाजार खाली न येता याच दरम्यान घोटाळत राहिला तर निवडक खरेदी करण्याचा आपला हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अमेरिकेच्या मध्यस्तीने किंवा स्वत:लाच उपरती होऊन युद्ध थांबलेच तर शेअर बाजार खाली येणार नाही, पण पुन्हा तेजीची दुडकी चाल पकडण्यासाठी व्याजदर कमी व्हायला लागतील.

मध्यपूर्वेतील देश सध्या खनिज तेलाच्या कमी उत्पादनात जास्त पैसे मिळवत आहेत. त्यातूनच पायाभूत सुविधांवर मोठा भांडवली खर्च तेथे होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील उद्योगांना त्यातून बऱ्याच मोठ्या मागण्या पुरवाव्या लागत आहेत. पुढील दहा वर्ष पुरतील अशा मागण्या लार्सन कडे जमा आहेत. त्याजोडीला भारतातही पायाभूत सुविधांचा शेवटचा टप्पा कार्यरत आहे. २०२४ च्या निवडणुकानंतर त्यातील पुढील धोरण ठरेल. युद्ध रशिया-युक्रेन च्या धर्तीवर चिघळले पण त्याने गंभीर रूप धारण केले नाही तर या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील उद्योगांकडे लक्ष देता येईल. त्यात लार्सन, पीएनसी इन्फ्रा, केएनआर कंस्ट्रक्शन तसेच अशोका बिल्डकॉन हे आघाडीवर असावेत.

वरील सर्व विवेचन करीत असतांना लांब पल्ल्याच्या निवेशकांसाठी युद्धजन्य परिस्थिती हि मोठी संधी आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. शेअर बाजाराकडे रोज न बघणाऱ्या गुंतवणूकदारासारखा सुखी इसम नाही.

हातातले भांडवल राखा, योग्य वेळी त्याचा आपापल्या जोखीमक्षमतेप्रमाणे विनियोग करा असे सुचते. सोने घ्यायचेच ठरले तर सॉव्हरीन बॉंड एक उत्कृष्ट पर्याय आहे, त्यासाठी सरकारने नवी विक्री करायची वाट पहावी अथवा शेअर बाजारातून घ्यावे. अन्यथा मागे सुचवलेला मल्टी अॅसेट फंड आहेच. त्यामार्फत सोने चांदी व खनिज तेल तिन्हीत गुंतवणूक करता येईल.

ही येणारी दिवाळी आमच्या सर्व वाचकांना, गुंतवणूकदारांना सुखसमृद्धीची जावो, तेजीचे सेंटीमेंट हातचे जाऊ न देता शेअर बाजार माफक प्रमाणात खाली येऊन खरेदीच्या नवनव्या संधी मिळत राहोत आणि येणारे वर्ष समृद्धीचे जावो हि प्रभूचरणी प्रार्थना !

Leave a comment