Skip to content Skip to sidebar Skip to footer

गैरसमज आर्थिक नियोजनाबद्दलचे

वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर आर्थिक नियोजनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तरीही त्याची गरज आणि उपयुक्तता ह्याबाबत जागरूकतेचा अभाव आहे. बहुतांश लोक अजूनही एका उत्तम आर्थिक नियोजनापासून दूर आहेत. याचे मुख्य कारण असे की लोकांमध्ये ह्यासंबंधित अनेक गैरसमज आहेत. या लेखात, आपण काही सामान्य गैरसमज बघूयात आणि ते का चुकीचे आहेत हे ही जाणून घेऊयात.

गैरसमज १: एकदाच करायची प्रक्रिया

आर्थिक नियोजनाबाबत सर्वात सामान्य गैरसमज हा आहे की हा एक वेळचा उपक्रम आहे. खरंतर आर्थिक नियोजन ही आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर घडणार्‍या वेगवेगळ्या घटनांनुसार आर्थिक नियोजनामध्ये योग्य ते बदल करणे क्रमप्राप्त आहे. उदा: एखाद्या व्यक्तीने लग्नाच्या आधी सुरू केलेले आर्थिक नियोजन त्याला किंवा तिला आजीवन पुरे पडेलच असे नाही. कारण जेव्हा नवीन
जबाबदार्‍या येतात तेव्हा त्यांचे अवलोकन करून त्यायोग्य आर्थिक नियोजन करावे लागते. जसे की मुलांचे उच्च शिक्षण, पुरेसा आरोग्य आणि जीवन विमा वगैरे.

गैरसमज २: ईतनी भी क्या जल्दी है?

होय मित्रांनो, गेली अनेक वर्षे, आर्थिक जागरुकतेचा प्रसार करत असताना मला अगदी नियमितपणे ऐकायला मिळालेले वाक्य – ईतनी भी क्या जल्दी है?. आर्थिक नियोजन हे उतारवयीन लोकांनी करायचे असते, आत्ता तर आमचे एंजॉय करायचे दिवस आहेत, असे विविध गैरसमज आहेत. विशेष म्हणजे पालकांमध्ये असलेला एक मोठा गैरसमज – आत्ता कुठे आमचा मुलगा / मुलगी नोकरीला लागले आहेत, त्यामुळे लगेच कुठे आर्थिक नियोजनासाठी त्यांच्या मागे लागता? लोकांनी आर्थिक नियोजन उतारवयात करावे, हे असे म्हणण्यासारखे आहे की “अभ्यासाची योग्य वेळ म्हणजे परीक्षेच्या आदल्या रात्री.” जर आपण आर्थिक नियोजनात विलंब करत राहिलो, तर वृद्धापकाळाची वर्षे अत्यंत तणावपूर्ण बनतात, तसेच ईतर आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होण्याची शक्यताही झपाट्याने कमी होते. आर्थिक नियोजन सुरू करण्याची योग्य वेळ पहिल्या मिळकतीच्या दिवसापासून असते. कारण चक्रवाढीमध्ये वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि लवकर गुंतवणूक करून, गुंतवणूकदार चक्रवाढीच्या जादुई परिणामांचा फायदा घेऊ शकतात.

गैरसमज ३ : फक्त श्रीमंतांसाठी

अनेकांना असे वाटते की आर्थिक नियोजन फक्त श्रीमंतांसाठी आहे. हे त्या सर्वांसाठी आहे ज्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे, इथे श्रीमंत-गरीब हा भेदभाव अस्तित्वात नाही. वास्तविक पाहता, मध्यमवर्गीय लोकांना श्रीमंतीच्या उंबरठ्यावर पोचण्यासाठी आर्थिक नियोजन हा उत्तम मार्ग आहे.

गैरसमज ४: तज्ञांची आवश्यकता नाही

असे अनेक लोक आहेत ज्यांना हे समजते की आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे परंतु ते तज्ञांची सेवा घेऊ इच्छित नाहीत. याचे कारण असे की त्यांना वाटते की ते त्यांचे आर्थिक व्यवस्थापन स्वतः करू शकतात. जर ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या साक्षर असेल तर हे काही प्रमाणात खरे असू शकते. पण, बरेच लोक आर्थिकदृष्ट्या साक्षर नाहीत. ते त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात पारंगत असू शकतात परंतु आर्थिक संसाधंनांचे बारकावे तज्ञांईतके त्यांना माहिती नसतात.

मित्रांनो, तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये अडसर ठरणार्‍या ह्या गैरसमजांचा बोळा तज्ञांच्या मदतीने काढून टाका, म्हणजे प्रवाह वाहता होईल!

Leave a comment