Skip to content Skip to sidebar Skip to footer

यंगीस्तानाचा अर्थबोध

आजच्या तरुणाई कडे पाहतांना काय दिसते ? त्यांचे लाडके अड्डे म्हणजे कॉफी शॉप्स, मित्रमंडळी सोबत टाइम पास हे मुख्य काम. थोडे पुढे जाऊन स्नॅक बार्स, बियर किंवा हुक्का बार्स किंवा पूल बार्स. त्यात प्रत्येक ठिकाणच्या वकुबाप्रमाणे क्रेडीट कार्ड्स चा बेसुमार वापर, थोडक्यात कुठलीही जबाबदारी अंगावर नसल्यामुळे कमावलेले पैसे घालवण्याच्या नाना तऱ्हा. जो हे खर्च करू शकत नाही किंवा ज्याला हे आवडत नाही तो आपोआपच ग्रुप मधून बाहेर फेकला जातो. बरेचशे पैसे एकमेकातील चुरस किंवा शो ऑफ मध्ये खर्च होतात. हे पाहिले की म्हणावेसे वाटते :

अरे तरुणांना सांगारे कुणी
संकट खिशाला वृद्धपणी
जो अर्थ नियोजन अंगी बाणी
त्यासम सुखात नाही रे कुणी

प्लॅनिंग चा एक नंबरचा शत्रू म्हणजे चालढकल किंवा दिरंगाई. बरेचदा आपण भविष्यासाठी काही पैसे बाजूला टाकावे हे पटलेले असते , पण करू उद्यापासून आज काय घाई आहे? अशा मनोवृत्तीमुळे सतत चालढकल होत असते. हे व्यायामाला सुरुवात करण्यासारखेच आहे, सकाळी अलार्म वाजल्यावर उठायचा कंटाळा हा एक नंबरचा शत्रू , त्यानंतरचा दुसरा म्हणजे आपल्याइतका प्रेरित झालेला जोडीदार सोबत नसणे, तिसरा म्हणजे म्हणजे फिटनेस ट्रेनरचा सल्ला घेण्यात कुचराई करणे.

शेवटी व्यायामाच्या प्लॅनिंगची ऐशी तैशी होते. व्यायाम न करण्याचे दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत, तसेच आर्थिक नियोजनाचे आहे. तरुणपणी शिस्त लागली नाही तर कधीच लागत नाही. पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब म्हणजे शाळेत किंवा कॉलेजला जायच्या वयातच मुलांना पैशाची किंमत व तो का जोडावा ह्याची जाणीव करून देणे. आजकाल मुलाला/मुलीला स्मार्ट फोन घेऊन देण्याची प्रथा आहे. त्याची निवड करतांना, तो किती महाग द्यायचा हे ज्याच्या त्याच्या हौशीवर अवलंबून आहे. पण त्याचवेळी एका वर्षानंतर तो किती रुपयांना विकला जाणार आहे हे जर का सांगता आले तर महागाईचा मुलांना थोडा तरी अंदाज येईल . तसेच तेच पैसे गुंतवले तर किती वाढू शकतात
हे दाखवून दिले तर गुंतवणूक व तिचा महागाईने होणारा ऱ्हास मुलांना लगेच कळेल. व लाडापोटी एक लाखाचा फोन न घेता दहा हजाराचा का घेतला हेही कळेल.

पुढे मुलाचे किंवा मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीची वेळ येते. आजकाल आईवडील स्वत:ची जबाबदारी मुलांवर टाकत नाहीत. त्यांना फक्त आपले खर्च, मौजमस्ती, बॅचेलर्स आयुष्य एन्जॉय करायचे असते. ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ म्हणत किती वर्षे निघून जातील याचा नेम नाही. अशावेळी आईवडिलांनी आपल्या पाल्याला नोकरी लागल्यावर किंवा अर्थार्जन सुरु झाल्यावर, प्रामाणिक अर्थ नियोजनकाराची ओळख करून देणे अत्यंत आवश्यक असते.

क्रीप्टो चलनामध्ये १८ कोटी भारतीयांनी गुंतवणूक ( ?) केली आहे. त्यातील बहुतेकांनी पैसे घालवलेच आहेत. त्याखेरीज गेमिंग नावाचे एक नवे खूळ बाजारात आले आहे. त्यात ११ कोटी भारतीय अडकलेले आहेत. ह्या दोन्ही प्रकारात ८० टक्के सहभाग तरुणाईचा आहे. नियमन व अनुपालनात न बसणाऱ्या पॉन्झी स्कीम्स, भिशा आदी फंडात कोट्यावधी भारतीय अडकलेले आहेत. दुर्दैव असे की जिथे हक्काने भांडवल वाढते पण त्यासाठी ते दीर्घकाळ ठेवावे लागते त्या म्युचुअल फंडाचे फ़ोलिओ हे फक्त साडे तीन कोटी आहेत. म्हणजे फ़ोलिओ १४.५ कोटी आहेत पण गुंतवणूकदार ३.५ कोटी आहेत. (Unique investor folio ) . असो.

ह्याची तीन कारणे आहेत .
पहिले म्हणजे अज्ञान
आणि दुसरे अतिलोभ.

तिसरे म्हणजे समवयीन मित्रांनी सांगितलेल्या परताव्याच्या बंडलांवर भाबडा अंध विश्वास.

माझे पैसे सहा महिन्यात किंवा एक वर्षात दुप्पट व्हायला हवेत ही अपेक्षा , तसे ते होऊ शकत नाही हे न कळण्याचे अज्ञान , कुणीही निरपेक्ष सल्लागार नाही, त्यामुळे शेवटी हातात काही उरत नाही हि वस्तुस्थिती.

क्रीप्टो करन्सी ला जरी सरकारने कर लावला असला तरी त्याला भारतात वैधता नाही व चलन म्हणून कुठलेही नियमन त्याला आपल्या देशात नाही. दुसरे असे की त्यात खरेदी विक्री करणारे प्लॅटफॉर्म्स विश्वासार्ह नाहीत. ते कधी बंद पडतील याचा नेम नाही. एके काळी १०० डॉलरला विकले जाणारे बीटकॉईन आज ३७००० डॉलरला विकल्या जात आहे हे खरे आहे. पण त्याचा प्रवास बघू

एप्रिल २०१३ १०० $
ऑगस्ट २०१७ २००००$
डिसेंबर २०१८ , ३१०० $
नोव्हेंबर २०२१ ६७००० $
आज ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२३ , ३७००० $

किंमतीतील इतका प्रचंड फरक झेलण्याची आपल्यात ताकद आहे का ? इतकी तेजीमंदी आपण सहन करू शकू का , हा विचार करूनच त्यातील गुंतवणुकीचे शिवधनुष्य उचलले पाहिजे. किंबहुना सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची हिम्मत असलेल्यालाच ते करता येईल. बीटकॉईनची अनेक स्वस्तातील भावंडे नंतर जन्माला आली. त्यातली बरीच काळाच्या ओघात नष्ट झाली. किती शिल्लक आहेत ते बघावे लागेल. तीच गत गेमिंग ची. गंमत म्हणून रमी किंवा पोकर खेळतांना किंवा क्रिकेट टीम तयार करतांना मजा येते, पण मग त्याचा नाद लागतो, नंतर पैसे लावले जातात, पुढे ते कॅसिनो पद्धतीने खिशातून जातच राहतात. असो.

चांगला आर्थिक सल्लागार या अशा धोक्यांची नेमकी माहिती देतो आणि एक शिस्तबद्ध आर्थिक प्रवास सुरु करू शकतो.
काय करायला नको ते कळलं, आता काय करायला हवे ते बघू.

नोकरी लागल्यावर सर्व प्रथम तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे, काय साध्य करायचे आहे , हे कागदावर नीट मांडायला हवे. आपल्या गरजा काय आहेत आणि इच्छा काय आहेत ते नीट समजून घेतले पाहिजे. कामावर जायला वाहन लागणे ही गरज झाली पण ती दुचाकी ऐवजी चारचाकी घेणे ही इच्छा/चैन झाली. पालकांनी विकत घेण्याची तयारी दाखवली तरी बाणेदारपणे सांगता आले पाहिजे की ते पैसे मला गुंतवणुकीसाठी द्या. प्रत्येकाचे दोन मोठे शत्रू आहेत. पहिला महागाई आणि दुसरा कर्ज किंवा त्यावरील व्याज. त्यतील सर्वात जहाल शत्रू म्हणजे क्रेडीट कार्डावरचे व्याज. माझा एक मित्र त्याच्या मुलाला गुंतवणुकीचे धडे देण्यासाठी माझ्याकडे घेऊन आला. मी त्याला सहज विचारले, तुझा पगार किती ? तो म्हणाला पन्नास हजार महिना !

‘वडिलांकडे राहतोस म्हणजे किमान २० टक्के तरी बाजूला टाकायला हवे ’- मी काका, माझे पाच क्रेडीटकार्ड्स आहेत, त्याचा किमान भरणा करायलाच पैसे कमी पडतात ! मग बाजूला कसे पडतील ? माझ्यासाठी सेव्हिंग बाबांनाच करायला सांगा ! – तो

मी निरुत्तर झालो. बाबा किती दिवस पुरणार ? हळू हळू क्रेडीट कार्डावरचे व्याज कसे चक्रव्याढ पद्धतीने वाढत जाते ते त्याला समजावून सांगितले , साडेतीन टक्के व्याज व त्यावर १८ टक्के जीएसटी, तो आकडा बघून त्याने डोळे पांढरेच केले, मित्रांबरोबर चुरस ठेऊन या पुढे क्रेडीट कार्ड वापरणार नाही असे आम्हाजवळ कबुल केले. तसे प्रत्यक्ष होण्यास पुढील सहा महिने व २ समुपदेशनाचे प्रसंग लागले पण आज तो दरमहा बचत करू लागला आहे.

आपले ध्येय स्वत:चे घर, लग्न, चारचाकी घेणे, पुढे संसाराच्या जबाबदाऱ्या व शेवटी निवृत्ती, व ते केव्हा गाठणार हे एकदा ठरवले की आयुष्याचेच नियोजन करणे सोपे जाते.

प्रथम आपले उत्पन्न व खर्च ह्याचा लेखाजोगा मांडावा. कामावरचा प्रवास दुपारचे खाणे इतर गरजा पूर्ण करतांना थोडीफार चैनही करावीशी वाटते. ते नैसर्गिक आहे. चैनीचा खर्च किमान लिहून जरी काढला तर तो कमी करणे शक्य होईल. त्यासाठीही बजेट असावे म्हणजे चैनही करता येईल व ती आटोक्यात राहील. अंगावर जबाबदाऱ्या नसतांना उत्पन्नाचा मोठा हिस्सा गुंतवणुकीसाठी वापरायला हवा. क्रेडीट कार्ड वापरात आपल्या विरुद्ध जाणारा नियम येथे आपल्या कामास येतो. तो म्हणजे भांडवल चक्रव्याढ पद्धतीने वाढू लागते . महागाई जर ६ टक्के असेल तर त्यावर मात करण्यासाठी आपल्याला गुंतवणुकीतून किमान १२ टक्के परतावा मिळायला हवा तरच पुढे येणाऱ्या महागाईला तोंड देता येईल.

प्रत्येक ध्येयाला एक अवधी व एका एसआयपीची जोड द्यायला हवी. केवळ दहा हजार रुपये दरमहा चांगल्या इक्विटी फंडात गुंतवले तर अगदी १२ टक्के व्याजाने वीस वर्षात एक कोटी रुपये, २५ वर्षात २ कोटी तर ३० वर्षात साडेतीन कोटी तयार होतात. गेले वीस वर्षातील शेअर बाजारातील परतावा दरसाल किमान १५ ते १६ टक्के आहे. वरील गणितात , हाच परतावा १५ टक्के धरल्यास हीच रक्कम तीस वर्षात जवळजवळ सात कोटी होऊ शकते. हीच तर चक्रव्याढ व्याजाची गंमत आहे. ह्याच प्रमाणे लग्न, वाहन , घराचे डाऊन पेमेंट, इत्यादी गोष्टींचे वेगवेगळ्या सीप मार्फत नियोजन करता येईल.

गुंतवणुकीला संरक्षणाचीही जोड द्यायला हवी . त्यासाठी मुदत विमा ( Term Insurance ) सर्वोत्तम . तरुण वयात ५० लाखाचा विमा जेमतेम १० ते १२००० रुपये वार्षिक हप्त्यात मिळतो . किमान तेव्हढ्या विम्याने सुरुवात करून तो नंतर वाढवता येईल. आपल्यामागे आईवडिलांना व लग्न झाल्यावर पत्नी व कुटुंबियांची स्वप्ने पूर्ण करण्यास ह्या विम्याने मोठा हातभार लागतो.

त्याजोडीला मेडीक्लेम अथवा आरोग्यविमा घ्यायला हवा. अजानक होणाऱ्या आजारपणाची , अपघाताची जोखीम विमा कंपनीकडे ढकलता येते. बजेटमध्ये लागलीच बसत नसेल तर, तरुणपणी मेडीक्लेम उशिरा घेतला तरी अपघातविमा जरूर घ्यावा . तो स्वस्त असतो . ( दहा लाखांना आठ नऊशे रुपये वार्षिक ) धडधाकट असतांना आजारपणाची शक्यता कमी असली, तरी अपघात कुणाचाही होऊ शकतो.

आपण नोकरी बदलू शकतो ही मनात खुणगाठ बांधून किमान ३ महिन्याच्या खर्चाचे पैसे वेगळे ठेवायला हवे.

तात्पर्य असे की संपूर्ण आयुष्याचाच विचार करून त्यात आपली , पालकांची स्वप्ने कागदावर मांडली व गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद अर्थनियोजनात आहे. आज भारत प्रगतीपथावर आहे व देशाच्या उत्पन्नाच्या वाढीचा वेग जगात सर्वाधिक आहे. भारतावर भिस्त ठेवणे व शक्य तितक्या लौकर गुंतवणूक सुरु करणे, त्यात नियमितता व शिस्त ठेवणे, जमेलतशी त्यात वाढ करत राहणे हाच समाधानाचा व समृद्धीचा मार्ग आहे.

Leave a comment