आर्थिक नियोजनाचा श्रीगणेशा!
आर्थिक नियोजन हा सर्वांच्याच आयुष्यातला एक महत्त्वाचा तरीही दुर्लक्षित असा भाग आहे आणि तो अगदी सहजपणे साध्य करणे हे कठीण नाही. यशस्वी आर्थिक नियोजनाचा श्री गणेशा करण्यासाठी साधे, सोपे आणि महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेऊयात.
बचत (सेव्हिंग) विरुद्ध गुंतवणूक (इन्वेस्टमेंट):
अनेकांना हे दोन शब्द समानार्थी वाटतात. अगदी सोप्या भाषेत सागायचे तर पैशांची बचत करणे म्हणजे पैसे “वाचवणे” आणि गुंतवणूक करणे म्हणजे पैसे “वाढवणे”. पैशांची बचत आणि साठवणूक दीर्घकाळामध्ये जास्त परतावा मिळवून देत नाही. म्हणून नुसती बचत
करण्याऐवजी गुंतवणूकसुद्धा करणे अनिवार्य आहे. गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत (जसे की कर्जरोखे, म्युचुयल फण्ड्स, शेअर्स ईत्यादी) ज्यांची निवड प्रत्येकजण आपापल्या जोखीम क्षमतेनुसार आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार करू शकतो.
आपत्कालीन निधी :
आर्थिक नियोजनामध्ये आपत्कालीन निधीला अनन्यसाधारण महत्व आहे. हा निधी कमीतकमी ६ ते १२ महिन्यांचा खर्च भागेल एवढा असावा, जेणेकरून काही कारणाने मासिक उत्पन्न कमी किंवा बंद झाल्यास तुमचा कौटुंबिक खर्च आणि कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडले जातील.
विमा कवच :
सामान्यतः सर्वात दुर्लक्षित केला जाणारा घटक म्हणजे विमा कवच. दुर्दैवी घटना आधी धोक्याची घंटा वाजवून येत नाहीत, त्यामुळे पुरेसा जीवन विमा तसेच संपूर्ण कुटुंबाचा आरोग्य विमा उतरवणे आणि सर्व हफ्ते वेळेच्या आधी भरणे ह्याला दूसरा पर्याय नाही.
महागाईचा राक्षस :
तुम्ही कितीही बचत केलीत तरी महागाईचा राक्षस तुमच्या पैशांचे मूल्य दरवर्षी कमी करत आहे. समजा महागाई दर ५% आहे आणि आज तुम्ही रोख एक लाख रुपये कपाटात ठेवले व १ वर्षांनंतर बाहेर काढले तर त्या लाख रुपयांचे मूल्य ९५,००० इतकेच असेल. म्हणून आर्थिक नियोजनामध्ये महागाई दरापेक्षा जास्त दराने परतावा देणार्या गुंतवणूक पर्यायांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे संपत्ति निर्मिती करू शकाल.
कुठे, का, आणि कसे? :
आर्थिक प्रवासात आपण आत्ता कुठे आहोत, आपण हे का करतोय, आणि आपण उद्दिष्टांकडे कसे पोचणार आहोत? थोडक्यात म्हणजे तुमच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवा आणि गुंतवणुकीला सुरुवात करा. तुम्ही आत्ता किती वयाचे आहात त्यानुसार पुढील किती वर्षांचे नियोजन करायचे आहे हे समजून घ्या. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आर्थिक नियोजनाची गरज असतेच.
आर्थिक सल्लागाराची नेमणूक करणे :
सामान्यतः आर्थिक निर्णय विचारपूर्वक न घेता, गोंधळलेल्या मन:स्थितीत आणि घाईघाईत घेतले जातात. अशावेळी एक तज्ञ आर्थिक सल्लागार तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोलाची मदत करू शकतो.
मित्रांनो, आर्थिक संसाधनांचे सुयोग्य व्यवस्थापन करून तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची ही प्रक्रिया म्हणजे आर्थिक नियोजन खरंतर सगळ्यांसाठी सोपे आहे. ज्याद्वारे तुम्ही स्वतः आर्थिक यशस्वी होताच, पण त्याचबरोबरीने पुढील पिढीसाठीदेखील एक भक्कम आणि उज्ज्वल भविष्याचा पाया रचता.